| माथेरान | वार्ताहर |
गेली पन्नास वर्षे माथेरान युथ सोशल क्लब आणि माथेरान नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरान मध्ये अश्वशर्यतींचे आयोजन केले जाते. या वर्षी देखील स्थानिकांसह पर्यटकांना डोंगरमाथ्यावर अश्वशर्यतीचा थरार अनुभवता आला. यामध्ये सर्वोत्तम घोडा, सर्वोत्कृष्ट जॉकी आणि आणखीन बरेच काही पारितोषिके देण्यात आली.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या वतीने ऑलिम्पिया रेसकोर्स म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल येथे (दि.25) आणि (दि.26) मे रोजी अश्वशर्यती पार पडल्या. माथेरान हे फक्त पर्यटनस्थळ नसून हॉर्स रायडिंग चे प्रमुख ठिकाण आहे. येथील ऑलिम्पिया रेसकोर्स येथे माथेरान मधील प्रमुख अश्वपालकांकडून रायडिंगचे धडे दिले जातात. अनेक अश्व प्रेमी येथे हॉर्स रायडिंग शिकतात. अशा नवोदित घोडा चालकांची या अश्व शर्यतींमध्ये परीक्षा असते. गॅलपिंग, ट्रॉटींग, म्युसिकल बॉल अँड बकेट, सॅडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ व्हॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक, म्युसिकल मग्स ऑन हॉर्स बँक, टॅट पेगिंग अशा स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत तर लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले आणि मुली यांच्यासाठी फ्लॅट रेस तर येणार्या पर्यटकांना सुद्धा यात भाग घेण्याची संधी उपलब्ध झाली होती. पर्यटकांसाठी रिले रेस चे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे माथेरानच्या थंड हवेत शर्यतीमध्ये सहभाग घेण्याची पर्यटकांना खास पर्वणी मिळाली. त्यामुळे येथे जास्तीत जास्त पर्यटकांनी आणि मुंबई, पुणे, हैद्राबाद येथून आलेल्या घोडेस्वारांनी आपली कसब दाखविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून येथील अश्व शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला.
अश्वशर्यतींमध्ये सर्वोत्कृष्ट घोडा म्हणून अँमेझॉन या घोड्याची निवड करण्यात आली. अँमेझॉन हा घोडा मागीलसलग चार वर्षांपासून सर्वोत्कृष्ट घोडा होण्याचा खिताब आपल्या नावावर करीत आला आहे. तसेच यंदाचा सर्वोत्कृष्ट जॉकी म्हणून हैद्राबाद येथील अयान मूर्ती आणि 14 वर्षे वयोगटाखालील चॅम्पियन जॉकी म्हणून देखील अयान मूर्ती याचीच निवड करण्यात आली. स्मार्ट हॉर्स ऑफ द माथेरानचा मानाचा खिताब निधी जाधव यांच्या डोरो या घोड्याने पटकावला. तर लाईफ टाइम आचिवमेंट अवॉर्डने जुने जाणते जॉकी राजेंद्र उर्फ लक्ष्मण कदम यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. अतिशय रंगतदार शर्यती पाहून आलेले पर्यटक मंत्रमुग्ध झाले. रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, जेष्ठ घोडेस्वार राजेंद्र कदम, माजी नगरसेवक संजय शिंदे, किरण जाधव, नितीन शेळके, अकबर मुजावर, खास करून एम.वाय.एस.सी चे संस्थापक प्रदीप दिवाडकर, पत्नी शर्मिला दिवाडकर आणि त्यांच्या मुलांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या अश्वशर्यती माथेरानचे पर्यटन वाढविण्याचे केंद्रबिंदू बनत चालले आहे. यापुढे याच्यापेक्षा ही चांगले असे खेळ मैदानात उतरवण्याचा आमचा मानस आहे. हे खेळ आम्ही अपग्रेड करून राष्ट्रीय पातळीवर कसे जातील याकडे लक्ष देणार आहोत.
प्रशाम दिवाडकर,
अध्यक्ष एम.वाय.एस.सी.
मला या अश्व शर्यतींसाठी निमंत्रण आले त्यानुसार आज या थंड हवेत मला येण्याचा योग आला. खूप आल्हाददायक वातावरणात या शर्यती झाल्या. भरपूर अश्वशर्यती आणि इव्हेंट्स पाहण्याचा योग आला. काही इव्हेंट्स असे होते की मी ते कधी पाहिले नव्हते. यामुळे नवोदित तरुणांना स्टेज मिळतोय अनेक होतकरू घोडेस्वार (जॉकी) तयार होत आहेत,अतिशय चांगला इव्हेंट झाला,पर्यटक नक्कीच खुश झाले असणार.
सोमनाथ घार्गे,
अधीक्षक रायगड पोलीस