माथेरान शारलोट तलाव गाळमुक्तीच्या प्रतिक्षेत

दहा वर्षांपासून तलावाची स्वच्छता गाळातच; पाणीटंचाईचे संकट ओढवणार

| माथेरान | वार्ताहर |

ब्रिटिशकालीन शारलोट तलाव अजूनही सफाईच्या प्रतीक्षेत आहे. गेली 10 वर्षे सफाई न केल्यामुळे तलावात गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. दोन वर्षांपूर्वी तलाव सफाई करणाऱ्यासाठी येथील श्री सदस्यांचे हात तयार होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तलावाचे गाळ काढण्याचे काम राहून गेले.

माथेरान या पर्यटनस्थळाचा शोध ब्रिटिशांनी लावला. त्यावेळी ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करीत नियोजनबद्धपणे शारलोट तलाव बांधला तेंव्हापासून या शारलोट तलावाच्या पाण्याचा उपयोग माथेरान करांना पिण्यासाठी होऊ लागला. तीन बाजूंनी उतार असल्यामुळे पावसाचे पाणी तीन दिशांनी वाहून या तलावात येते. हे पावसाचे पाणी तलावात वाहून येताना माती, झाडाझुडपांची लाकडे, पर्यटकांनी टाकलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या गाळरुपात तलावात साचून राहतात. ऑक्टोबरमध्ये हा तलाव तुडुंब भरल्यानंतर यातील पाणी मार्च महिन्या पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राखीव ठेवले जाते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत पाण्याचा उपसा नेरळ कुंभे येथून केला जातो. त्यामुळे पाऊस पडे पर्यंत या तलावात पाणीसाठा असतो. नेरळ कुंभे येथून पाणी कधी आले नाही तर शारलोट तलावातील पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे माथेरानमध्ये पाणीटंचाई भासत नाही. गेल्या दहा वर्षात येथे तलावाची सफाई झाली नाही. 2014 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तलावाची सफाई करण्यात आली होती. 2014 नंतर या तलावाकडे ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष दिले ना नगर पालिकेने त्यामुळे 10 वर्षांत तलावात गाळ मोठ्या प्रमाणात आला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपालिका मिळून हा तलाव गाळ मुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. मागील 2022 मध्ये शारलोट तलाव गाळमुक्त करण्यासाठी पालिकेने जोरदार प्रयत्न केले. यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सकारात्मक प्रतिसादही मिळाला. तलाव स्वच्छतेसाठी सर्व साहित्यांची व्यवस्था पालिकेकडून केली गेली. तलावातील पाणी सोडल्यामुळे त्या मार्गातील गावांना धोका होऊ नये, यासाठी त्या गावांशी पालिका व एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला नाही.त्यामुळे हि सगळी प्रक्रिया फक्त कागदावरच राहिली.

शारलोट तलावाची स्वच्छता होणे गरजेचे आहे. जितके जास्त पाणी साचेल तितका पाण्याचा साठा वाढेल. पूर्वी दरवर्षी तलावातील गाळ काढला जात असे तिच मानसिकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि माथेरान नगरपालिकेने दाखवायला हवी. एकमेकांच्या समन्वयाने हे काम तडीस जाऊ शकते.

जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान
Exit mobile version