माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये ई रिक्षा सुरु झाल्याने विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी आणि माझे असंख्य कार्यकर्ते ई रिक्षाच्या समर्थनार्थ जाहीर पाठिंबा देऊन सक्षम उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत असे माजी नगराध्यक्ष दिलीप गुप्ता यांनी सांगितले आहे. ई रिक्षाचे सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते निवृत्त शिक्षक सुनील शिंदे,हात रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी दिलीप गुप्ता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गुप्ता पुढे म्हणाले ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची दूरवर शाळेत जाताना होणारी पायपीट, जेष्ठ पर्यटकांना त्याचप्रमाणे रुग्णांना, नागरिकांना या ई रिक्षाच्या व्यवस्थेमुळे न्याय मिळाला आहे. आज जेष्ठ पर्यटकांची संख्या याच ई- रिक्षामुळे वाढली आहे आणि भविष्यात आणखीन वाढणार आहे यात शंकाच नाही. माथेरान ची जनता पालिका निवडणुकीत ई रिक्षा समर्थक पॅनलच्या बाजूनी ठाम पणे उभी राहील अशी अपेक्षा आहे.गावाच्या व पुढील पिढीचा विचार करण्याची हीच वेळ आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.
जर गावात परिवर्तन झाले तर इथे आपसूकच पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारी संपुष्टात येईल आणि माथेरान मधील प्रत्येक नागरिक असो किंवा सुशिक्षित बेरोजगार युवक असोत ई रिक्षा मुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायात आपल्या कुटुंबातील सदस्यांना आधार देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे येणार्या पर्यटकांना फिरण्यासाठी आपल्या आवडीनुसार वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत.त्यामुळे या होत असलेल्या परिवर्तनाचा सर्वाना स्वीकार करावा लागणार आहे. जेवढा विरोध होईल तितक्या जोमाने ही सेवा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या परीने पाऊल उचलेल असा विश्वास दिलीपसेठ गुप्ता यांनी व्यक्त केला.