माथेरानकरांना पंप नादुरुस्तीचा फटका

फक्त एक तास पाणी पुरवठा

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये गेली चार दिवस पर्यटनस्थळ माथेरानला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सोमवारी फक्त एक तास पाणी वितरित करण्यात आल्याने येथे एमजेपी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना (उबाठा) गटाकडून आंदोलन करणार, असे पत्र एमजेपीला देण्यात आले.

शुक्रवार संध्याकाळपासून माथेरानकरांच्या घशाला कोरड घालणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सोमवारी सकाळपासून प्रत्येक विभागाला फक्त एक तास पाणी पुरवठा सुरू केला. नेरळ, कुंभे येथे फुटलेल्या जलवाहिनीचे काम पूर्ण केल्यानंतर रविवारी रात्री सुरू केली, पण नेरळहुन जुमापट्टी, वॉटरपाईप व माथेरान असा दहा ते अकरा किलोमीटर उंच डोंगर पाणी चढून फिल्टर हाऊसपर्यंत येण्यास विलंब होत आहे. 12 तास हे पाणी पंपिंग केल्यानंतर फिल्टर हाऊस येथील टाक्या भरण्यास सुरुवात झाली. त्या पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सकाळपासून पाणी वितरित करण्यास सुरुवात केली. पण हे पाणी फक्त एकच तास दिल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

माथेरानमध्ये 460 घोडे, 300 मालवाहू घोडे, कोंबड्या, बकऱ्या, गाई, म्हशी असे पशुधन असून त्यांनाही प्यायला पाणी नाही. त्यामुळे, अश्वपाल संघटनेकडून पाणी नसल्यामुळे संताप व्यक्त केला गेला. काही अश्वपालकांनी नैसर्गिक जलस्रोतावरून अश्वांसाठी पाणी आणले.

पंप नादुरुस्त
शारलोट तलावातील पंप हाऊसमधील नादुरुस्त झालेला 75 हॉर्स पॉवरचा पंप अजूनही पंप हाऊसमध्येच आहे. एक 100 हॉर्स पॉवरचा पंप दुरुस्तीसाठी बाहेर पाठविण्यात आला आहे. याबाबत पाहणी करण्यासाठी गेलो असता कोणीही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. तिथे फक्त कंत्राटी कामगार उपस्थित होते. त्यामुळे माथेरानमधील पंप कधी दुरुस्त होणार असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

माथेरानमध्ये गेली पाच दिवस पाणी नाही. जनता पाण्यामुळे त्रस्त आहे. जनावरांना पाणी नाही ही अत्यन्त संतापजनक बाब आहे. लोकांना पाणी मिळावे यासाठी आम्ही 27 तारखेला आंदोलन करण्याबाबत पत्र दिले आहे. जर दोन दिवसात पाणी सुरळीत झाले नाही तर शिवसेना (उबाठा) आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही.

प्रसाद सावंत
Exit mobile version