पाणीपट्टी दराने माथेरानकर हैराण

पाणी चोरीसह पाणी गळतीवर नियंत्रणाची गरज


| माथेरान | प्रतिनिधी |

शहरामध्ये पाणीपट्टीच्या दरात वाढ झाल्याने घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. पाणी चोरीसह पाणी गळतीवर नियंत्रण आणून दरवाढीबाबत माथेरानकरांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून नगर पालिकेकडून वाढीव दराने पाणीपट्टी आकारण्यात येते. अन्य पर्यटनस्थळी एवढया प्रमाणात पाण्याचे दर नसल्याने स्थानिकांसह व्यावसायिक त्रासले आहेत. याआधी नगरपरिषदेच्या माध्यमातून गावातील प्रमुख ठिकाणी नळ बसवण्यात आले होते. त्याचे पाणी बिल हे नगर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून भरण्यात येते होते. तसाच पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

मुख्यत्वेकरून वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने खरेदी कराव्या लागतात. वर्षातून फक्त 80 दिवस मुख्य सुट्ट्यांचा हंगाम येथील व्यावसायिकांना मिळतो. त्यामुळे आर्थिक गणित सोडविताना त्यांची दमछाक होते. दरम्यान, माथेरानमध्ये 1100 घरगुती, तर सुमारे 350 व्यावसायिक पाणी जोडण्या आहेत.

प्रत्येकी एक हजार लिटर पाणी वापराचे दर
घरगुती वापरासाठी पहिल्या 15 हजार लिटरला 26 रुपये प्रमाणे दर आकारण्यात येत आहे. 15001 ते 25000 लिटरसाठी 39 रुपये आणि 25001 लिटरच्या पुढील वापरासाठी 53 रुपये, शाळा व संस्थांना 69 रुपये, हॉटेल व लॉज व्यावसायिकांसाठी (अ दर्जा) 178 रुपये, (ब दर्जा) 142 रुपये, (क दर्जा) 118 रुपये असा दर आकारण्यात येत आहे.

अन्य ठिकाणच्या पर्यटनस्थळांपेक्षा माथेरानमधील पाण्याचे दर अधिक आहेत. नेरळ येथील उल्हास नदीतून येणाऱ्या पाईप लाईनमधून खालच्या भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे 24 तास पाणी वापरले जाते. तसेच पाणी गळतीचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्याचा भार माथेरानच्या ग्राहकांवर टाकला जातो. सौरऊर्जेचा वापर करुन वीजनिर्मिती करता येऊ शकते. तसेच निर्माण होणारी वीज महावितरणला विकता येईल आणि त्या बदल्यात वीजबिलापोटी सवलत मिळवता येईल. याकडे अधिकारी वर्गानी लक्ष दिले पाहिजे.

शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपालिका
Exit mobile version