अखेर माथेरानच्या ई-रिक्षाला मिळाला मुहूर्त

दत्त जयंतीच्या मुहूर्तावर होणार सेवेत दाखल

| कर्जत | प्रतिनिधी |

गेल्या मार्च महिन्यापासून ई-रिक्षा बंद होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 26 डिसेंबर या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर ई-रिक्षा पुन्हा माथेनारकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली. ई-रिक्षा सुरु होणार असल्याने पर्यटनवाढीला नवीन आयाम प्राप्त होणार असून, स्थानिकांची सोय होणार आहे.

माथेरान हे पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहे. दस्तुरी नाक्याच्या पुढे मोटार वाहनांना बंदी आहे. फक्त अग्निशामक दलाची गाडी किंवा रूग्णवाहिका यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच, अंतर्गत वाहतुकीसाठी हातरिक्षा अथवा घोडा याचाच वापर केला जातो. हातरिक्षा ही अमानवीय प्रथा बंद करण्यासाठी निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यांना त्यात यशही आले आणि न्यायालयाने तीन महिने पायलेट प्रोजेक्टला मान्यता दिली होती. तीन महिने विनाअडथळा हा प्रयोग यशस्वीदेखील झाला होता. पण, त्यानंतर मात्र ई-रिक्षा बंद करण्यात आल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची पुन्हा पायपीट सुरू झाली.

ई-रिक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे, प्रकाश सुतार, शकील महापुळे यांच्यासह रिक्षा संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी उपोषणदेखील केले होते. नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी कार्यभार हाती घेताच ई-रिक्षासंदर्भात श्रमिक रिक्षा संघटनेशी चर्चा केली. त्याबाबत अभ्यास करून ई-रिक्षा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध होणार असल्याने त्याचा फायदा पर्यटनवाढीस होऊन दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार असून विद्यार्थांची पायपीट थांबणार आहे.

Exit mobile version