महापौर रितू तावडे यांचा पाहणी दौरा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईत पावसाळ्या दरम्यान पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्वंकष आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. विशेषतः परिमंडळ 5 मधील विविध नाले, कल्व्हर्ट मधील गाळ उपशाची कामे तसेच जलनिसारण व्यवस्थेची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल, तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखल भागांचा आढावा घेऊन तेथील उदंचन पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावेत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देखील महापौर तावडे यांनी दिले.

महापौर रितू तावडे यांनी विविध ठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसा कामांची पाहणी केली. त्यामध्ये घाटकोपर (पूर्व) येथील जय अंबे नगर येथे सोमय्या नाला, गोवंडी येथील घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गावरील सुभाष नगर नाला, चेंबूरच्या पूर्व मुक्त मार्गाजवळील वाशी नाका नाला, जिजामाता नगर कल्व्हर्ट, चेंबूर येथील आर. सी. मार्गाजवळील नाला, अयोध्या नगर येथील मानसिंह विजय सोसायटीजवळील नाला या ठिकाणांना सोमवारी (दि.1) सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेविका प्रज्ञा सदाफुले, उपायुक्त (परिमंडळ 5) संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते.

Exit mobile version