। पेण । प्रतिनिधी ।
अवैध सावकारी प्रकरणी फरार असलेल्या मयूर धांडे, रमेश भोईर यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असून, न्यायालयाने या दोघांना शनिवारी(17 डिसेंबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणाती प्रमुख आरोपी साजन पाटील याला मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अवैध सावकारीच्या त्रासाला कंटाळून 17 नोव्हेंबर 2022 ला दिव येथील तरूण विजय म्हात्रे यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर 4 आरोपीं विरूध्द वडखळ पोलीस ठाण्यात 306 खाली गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एक आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले होते. तर त्यातील तीन आरोपी अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करत होते.
जिल्हा न्यायालयाने या आरोपींचे जामीन फेटाळले होते. तरी देखील आरोपी साजन पाटील, मयुर धांडे, रमेश भोईर हे पोलीसांच्या हाताला लागत नव्हते. त्यातील साजन पाटील यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. तेथे त्याला दिलासा मिळाला, मात्र मयुर धांडे व रमेश भोईर या आरोपींना अटकपूर्व जामीन न मिळाल्याने स्व:ताला पोलीसांच्या स्वाधीत करणे क्रमप्राप्त होते. अखेर मयूर धांडे आणि रमेश भोईर यांना पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता शनिवार दि.17 डिसेंबर 2020 पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाणे करत आहेत. जरी यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असता तरी त्या जामीना विरूध्द मयत तरुणाचे नातेवाईक सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या मनस्थितीत आहेत.