मॅकविला द जंगल यार्डची ‘वानरटोक’ मोहीम

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वानरटोक सुळका मोहीम ‘मॅकविला द जंगल यार्ड’ च्या मॅकमोहन, संदीप काळे, पंकज गावकर या आरोहकांनी रविवार (दि.31) मार्च रोजी फत्ते केली.

सागरगडाच्या दक्षिण टोकासमोरच वानरटोक सुळका आहे. गडाच्या टोकाच्या डाव्या बाजूवरून खाली उतरणार्‍या पायवाटेने सुळका व गड यांमधील खिंडीत दोरीच्या सहाय्याने सुरक्षीत पोहोचता येते. या खिंडीतूनच आरोहणाची सुरुवात सकाळी 10 वाजता करण्यात आली. पहिला टप्पा 30 फूट चिमणीतून आरोहण करून वरच्या धारेवर पोहोचले. दूसरा टप्पा 10 फूट उभं आरोहण करत तिसरा टप्पा 50 फूट सुळक्याला उजवीकडे ठेवून वळसा घालत मागच्या बाजूला पोहाचले. अंतिम टप्पा 30 फूट मागील बाजूने सरळ नाध्याच्या दिशेनं आरोहण करून दुपारी 1 वाजेपर्यंत माथा गाठण्यात आरोहकांना यश आले.

गडाचा इतिहास
मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्याची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनार्‍याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनार्‍यापासून हा किल्ला 5 मैल दूर आहे. माचीवर 100 घरांची वस्ती आहे.
कसे पोहचाल
मुंबईहुन अलिबाग रोडवर असणार्‍या खंडाळे गावातुन सरळ सागरगडमाचीवर मोटर गाडीने पोहचता येते. तेथुन तासभरात सागरगडावर पोहचता येते. माचीवर अन्न, पाणी, निवार्‍याची सोय आहे. तसेच, आपल्या माहितीसाठी तेथे गाईड उपलब्ध असतात.
Exit mobile version