200 फूट उंचीवर पिच क्लायम्बिंग; मॅक विला द जंगल यार्डची यशस्वी मोहिम
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या परिसरात वसलेल्या ‘डांग्या सुळका’ या थरारक सुळक्यावर 17 मे रोजी यशस्वी पिच क्लायम्बिंग मोहिम पार पडली. साधारणतः 200 फूट उंचीच्या या उभ्या सुळक्यावर रायगड जिल्ह्यातील ‘मॅकविला द जंगल यार्ड’ या संस्थेच्या गिर्यारोहकांनी ही चढाई पूर्ण केली. ही मोहिम तांत्रिक गिर्यारोहणाच्या पद्धतीने, म्हणजेच ‘पिच क्लायम्बिंग’ या प्रकारात राबविण्यात आली. अशा प्रकारच्या चढाईमध्ये तांत्रिक ज्ञान, योग्य नियोजन, आणि संयम आवश्यक असतो.
या मोहिमेसाठी सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याने राखण्यात आली होती. या मोहिमेत सागर मेस्त्री, राम वाघे, हिनल संगोई आणि मॅकमोहन या गिर्यारोहकांनी प्रमाणित हार्नेस, हेल्मेट्स, कॅराबायनर्स, रोप्स, आणि इतर आवश्यक चढाई उपकरणे वापरली. मोहिमेपूर्वी संपूर्ण टीमने प्रशिक्षण घेतले होते. येथे मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पोळे आहेत. पूर्वी येथे मधमाशांच्या हल्ल्यामुळे खूप वेळा अपघात होऊन काहींचा मृत्यू देखील झाला आहे. 2019 मध्ये ‘सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह’ या संस्थेकडून रिबोल्टींग करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण चढाईदरम्यान पर्यावरणाचा समतोल राखून कोणतीही हानी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती.
या साहसी मोहिमेचे आयोजन ‘मॅकविला द जंगल यार्ड’ या सुधागडच्या स्थानिक गिर्यारोहण संघटनेच्या पुढाकाराने करण्यात आले होते. मोहिमेचा प्रमुख उद्देश तरुणांमध्ये साहसी खेळांबद्दल जागरूकता वाढवणे, गिर्यारोहणाच्या संस्कृतीला चालना देणे व नवोदित गिर्यारोहकांना संधी देणे, हा होता. यशस्वी चढाईनंतर गिर्यारोहकांनी डांग्या सुळक्याच्या माथ्यावर उभे राहून परिसरातील सह्याद्री पर्वतरांगेचे निसर्गसंपन्न दृश्य अनुभवत विजयाचा आनंद व्यक्त केला. हा उपक्रम केवळ गिर्यारोहकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे. गिर्यारोहण संस्था, स्थानिक प्रशासन आणि साहसी क्रियाकलापांशी संबंधित सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहिम सुरळीत पार पडली. भविष्यातही अशा स्वरूपाच्या मोहिमा राबवून जिल्ह्याच्या गिर्यारोहण परंपरेला नवा उजाळा देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पिच क्लायम्बिंग म्हणजे काय?
पिच क्लायम्बिंगमध्ये संपूर्ण उंची एकाच वेळी चढण्याऐवजी ती लहान लहान टप्प्यांमध्ये विभागली जाते. प्रत्येक पिच म्हणजे एक स्वतंत्र चढाईचा टप्पा असतो, जिथे गिर्यारोहक पुढे सरकताना सुरक्षा दोर आणि इतर साजोसा वापरत जातात. यावेळी डांग्या सुळका सर करताना पहिला टप्पा 60 फूट, दुसरा टप्पा 60 फुट, तिसरा टप्पा 70 फूट व अंतिम टप्पा 10 फूट असे अंतर पार करत सहभागी गिर्यारोहकांनी उत्तम प्रकारे यश मिळवले.