निकृष्ट रस्त्यांच्या कामांचा घेतला समाचार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील खड्डेमय रस्ते व निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.23) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी निकृष्ट दर्जाच्या कामांचा खरपूस समाचार घेण्यात आला. तसेच, कार्यकारी अभियंता सुखदेवे यांची भेट घेऊन तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या शेकापच्या तालुका पदाधिकारी मेळाव्यानंतर पक्षाचे पदाधिकारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकले आहेत. यावेळी तालुक्यातील ढासळलेल्या रस्त्यांच्या स्थितीबाबत आणि निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यात आला. रामराज ग्रामपंचायतमधील महान फाटा ते महान वाडी रस्ता, तळवली ते भोनंग तसेच मापगाव विभागातील रस्ते सध्या अतिशय खराब अवस्थेत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. नुकतेच 50 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मोऱ्या अवघ्या 15 दिवसांतच खचून गेल्या आहेत. त्यांच्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे जनसामान्यांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. हा स्पष्टपणे ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा आणि गैरप्रकारांचा नमूना असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यावेळी तक्रारींची दखल घेत दोषी ठेकेदारांवर चौकशीसह कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांनी दिले आहेत.
शेकापचे अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, युवक सदस्य अभिजित वाळंज, निलेश खोत, विभागीय चिटणीस संदीप गायकवाड, ॲड. शोधन ठाकरे, अक्षय डिकले, यश पाटील, नितीन जानकर, बाळू नवखारकर, नवनीत पाटील आदी शिष्टमंडळांनी भेट घेत निकृष्ट रस्त्यांच्या कामांचा खरपूस समाचार घेतला आहे.
अलिबाग-रोहा मार्गासह मापगाव परिसर व अन्य ठिकाणी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरु आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची तातडीने दूरुस्ती करण्यात यावी, त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. रस्ते सुधारले नाहीत, तर मोर्चा काढून आता थेट आंदोलन पुकारले जाईल.
सुरेश घरत,
शेकाप तालुका चिटणीस
रस्ते सुधारले नाहीत आणि यापुढे जर अशा रस्त्यांमुळे अपघात झाला तर विभागाला जबाबदार धरून संपूर्ण बिल अधिकाऱ्यांच्या नावे पाठवण्यात येईल.
विक्रांत वार्डे,
शेकाप तालुका युवक अध्यक्ष