पर्यटकांमधून नाराजीचे सुर
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील राजपुरी बंदराजवळील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून शेकडो पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे शनिवार-रविवार सुट्टीची मज्जा घेण्यासाठी 24 मे रोजी शेकडोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी व खोरा जेट्टीवर आले होते. परंतु, यावेळी वेळेआधीच पुरातत्व विभागाने अचानक किल्ला बंद केल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. त्यांच्यातून प्रंचड नाराजीचे सुर उमटत आहेत.
तत्पुर्वी शासकीय स्तरावरून 26 मे पासून जंजिऱा किल्ल्याचे दरवाजे बंद केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याची नोंद पर्यटकांनी घेऊन पुरातत्व विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पुरातत्व संशोधन विभागाचे सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी केले होते. त्यामुळे शनिवार-रविवारी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी राजपुरी व खोरा जेट्टीवर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. परंतु, अचानक पुरातत्व खात्याकडून हा जंजिरा किल्ला बंद करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले. दरम्यान, कोकण किनाऱ्याजवळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्ट्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळु शकतात. त्यामुळे मोठा आघात घडु शकतो. त्याची खबरदारी व पर्यटकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने शनिवारी (दि.24) जंजिरा किल्ला बंद करण्यात आला आहे. तसेच, रविवारी देखील खराब हवामान असेल तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नसल्याचे पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आले आहे. शेवटी काही पर्यटकांनी जेट्टीवर उभे राहुन सेल्फी काढले तर काहींनी राजपुरी जेट्टीवर असणाऱ्या शिड्याच्या बोटीतून बाहेरून किल्ला पाहण्याचा आनंद लुटला.