। खांब । वार्ताहर ।
पहिल्याच पावसात खांब नाक्यावरील रस्त्यांची दैना उडाल्याने रहिवासी वर्गातून संबंधित प्रशासनाविरूद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोरील रस्ता, तेथूनच बाजूला असलेल्या गावाकडे जाणारा रस्ता व कोलाडकडे जाणारा पादचारी मार्ग तसेच बाजूलाच असलेला पादचारी पुल आदी भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले आहे. त्यामुळे येथील परिसर सद्यस्थितीत जलमय झाला असून मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात अशी भयानक अवस्था झाली तर प्रत्यक्षात पावसाला सुरुवात होईल तेव्हा येथून मार्गक्रमण करणे मोठेच अवघड असणार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवासी वर्गातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवासी वर्गातून होत आहे.