| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या कर्जत-मुरबाड महामार्गावरील वंजारवाडी येथील पेज नदीवरील पुलाच्या परिसरात मोठंमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता काँक्रिटच्या माध्यमातून बनवण्यात आला होता. परंतु, काही मीटर अंतरावर प्रचंड मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून तब्बल दोन वर्षांपासून रस्त्यावर तो भाग काँक्रिट न करण्याचे कारण समजून येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गावरून लोणावळाकडे येणाऱ्या वाहनांसाठी मुरबाड-कर्जत हा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील बहुतांश भाग काँक्रिटचा बनविण्यात आला असून, कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी डांबरी रस्ताच ठेवण्यात आला आहे. परिणामी पळसदरी ग्रामपंचायतमधील वर्णे आणि कडाव ग्रामपंचायतमधील पेज नदी पुलाजवळील वंजारवाडी येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. कर्जतकडून मुरबाडकडे जाणारा रस्ता हा काँक्रिटच्या आहे. मात्र, वंजारवाडी आदिवासी वाडी येथील उतरणीचा भाग सुरू होतो, त्याठिकाणी डांबरी रस्ता असून तो आता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वेगाने आलेल्या वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, मुरबाड बाजूने कर्जत दिशेला येणारे वाहन देखील पुलाच्या सुरुवातीला पडलेल्या खड्ड्यात आपटून भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. मुरबाड-कर्जत महामार्ग खड्डेमय होत असूनही गेल्या दोन वर्षांत या भागातील रस्त्याच्या काँक्रिटकरणाची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलेली नाही. तसेच, ते खड्डे तात्पुरते भरण्याची तसदी देखील रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आलेली नाही. त्याचवेळी पेज नदीवरील वंजारवाडी पुलावर अत्यंत अरुंद भाग आहे आणि त्याच पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमुळे वेगाने आलेले वाहने थेट नदी पात्रात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.