। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील नेरळ बाजारपेठ भागातील वाहतूक कोंडीवर नेरळ पोलीस ठाण्याच्या शांतता कमिटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पोलीस उप अधीक्षक धुलदेव टेले यांच्या अध्यक्षतेखाली नेरळ पोलीस ठाणे हद्दीची शांतता कमिटीची सभा झाली. त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील अनेक गावातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी अंकुश दाभने, आरिफ भाईजी, आयुब टिवाले, सर्फराज नजे, अॅड. सुमित साबळे, अरविंद कटारिया, अॅड. सम्यक सदावर्ते, झोमन पालटे, सावळाराम जाधव, पुंडलिक शिनारे, नितीन कांदळगावकर, रोहिदास मोरे, गोरख शेप, संजय अभंगे, जैतू पारधी आदी उपस्थित होते. या बैठकीत बहुतेक सर्व उपस्थित यांनी नेरळ गावातील वाहतूक कोंडीबद्दल तक्रारी केल्या. त्यात शेवटी चर्चेतून नेरळ बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि अंबिका नाका येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येईल अशी माहिती दिली. पार्किंग करून ठेवलेल्या गाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. गणेश उत्सव आणि ईद निमित्त अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती दिली.