कोशिंबळे येथे यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक

। माणगाव । प्रतिनिधी ।

बदलत्या काळात शेती अधिक किफायतशीर, आधुनिक आणि उत्पादनक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या पुढाकारातून कोशिंबळे (ता. तळे) येथे प्रगतशील शेतकरी बापू बबकम यांच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक पार पडले. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

शेतमजुरांची टंचाई, वाढता मजुरी खर्च आणि वेळेअभावी अनेक शेतकऱ्यांना भात लागवडीत अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर यांत्रिक भात लागवड ही काळाची गरज ठरत असून, कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य अंतरावर रोपांची लागवड करून अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रभावी पर्याय असल्याचे या प्रात्यक्षिकातून स्पष्ट झाले. प्रात्यक्षिकावेळी आधुनिक भात लागवड यंत्राच्या साहाय्याने रोपांची अचूक आणि समसमान लागवड कशी केली जाते, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, खत व्यवस्थापन सुलभ होणे, तण नियंत्रणास मदत आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी यंत्राची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहून विविध शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा तंत्र अधिकारी सीमा चौधरी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अशा प्रात्यक्षिकांमुळे आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष समजण्यास मदत होत असून, भविष्यात यांत्रिक भात लागवडीचा अवलंब करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतीचे आधुनिकीकरण, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Exit mobile version