चोरढे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील चोरढे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल सुदाम घाग यांच्या शेतावर सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक पद्धतीने भात पिकाची लागवड करण्यात आली.

चालू वर्षात एल-निनोच्या परिणामामुळे तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भात रोपवाटिकांचे नुकसान झाले. मात्र, सुनिल घाग यांनी भात लागवडीसाठी आवश्यक रोपे ट्रेमध्ये तयार केल्याने रोपांची समान वाढ होऊन ती सुस्थितीत राहिली. या पद्धतीमुळे प्रति एकरी केवळ 10 किलो बियाण्याची आवश्यकता भासली. सुमारे 15 दिवसांच्या भात रोपांची यंत्राद्वारे लागवड करण्यात आली. यंत्राच्या साहाय्याने लागवड केल्यामुळे ओळीतील व रोपांतील आवश्यक अंतर अचूक राखले गेले. त्यामुळे पिकामध्ये हवा व सूर्यप्रकाशाचा योग्य संचार होऊन कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.

यांत्रिक लागवडीमुळे मजूर टंचाईवर प्रभावीपणे मात करता आली असून, कमी वेळेत व योग्य कालावधीत भात लागवड पूर्ण झाली. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होण्याबरोबरच भविष्यात अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुनिल घाग यांनी सलग तीन वर्षे यंत्राद्वारे भात लागवड करून परिसरातील इतर शेतकऱ्यांसमोर आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.

यांत्रिक लागवडीमुळे मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. कमी कालावधीत अधिक क्षेत्राची लागवड पूर्ण होत असल्याने वेळेची बचत होते. तसेच योग्य अंतरावर लागवड झाल्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी यांत्रिक भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम यांनी केले आहे.

Exit mobile version