अखेर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने पूर्णेकर कुटुंबीय आणि शिवसेना ठाकरे गटाच्या निशाण्यावर असणाऱ्या शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वाची बदनामी टाळण्यासाठी आपण राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खा. संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आरोपीना अटक करण्याची मागणी केली.

ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला तरी या प्रकरणातील मास्टरमाईंडला अद्याप अटक का करण्यात आली नाही? एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा का कामाला लावली आहे? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विचारला. पोलिसांसमोर सगळे पुरावे असतानाही ते काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सगळी सरकारी यंत्रणा कामाला का लावली आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच, आम्ही न्याय मागत असताना ठाण्याच्या खासदारांची भाषा बघा, असे सांगत नरेश म्हस्के यांच्यावरही टीका केली. ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा झाला आहे. मग आता त्यांना अटक कधी करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

Exit mobile version