। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रांतील मान्सुनपूर्व कामांचा आढावा आज आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयात घेतला. या बैठकिस सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, पोलिस विभाग, आयआरबी या आस्थांपनांतील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालिका क्षेत्रात पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या विविध भागांची माहिती घेऊन ते साठू नये यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलींद कदम, सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी आर.एन दिवेकर, सं.बा. माळी, पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, गणेश खांडेकर, कार्यकारी अभियंता सिडकोचे विलास बनकर,सहाय्यक कार्यकारी अधिकारी धनंजय चिखलेकर , आयआरबीचे संपर्क अधिकारी मदनलाल गांधी उपस्थित होते. निसर्गाचे रूप बदलले आहे. कधी कधी पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त मोठा पाऊस होऊन सखल भागात पाणी साठते आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. म्हणूनच शासनाच्या विविध आस्थापनांनी मान्सूनपुर्व कामांमध्ये महापालिकेला सहाकार्य करावे अशी विनंती आयुक्तांनी केली. सिडको नोड्स नाल्यांमधील पाणी साठून गैरसोय होणाऱ्या ठिकांणाचा सिडको आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पहाणी दौरा येत्या 18 मे रोजी करावा आणि त्या ठिकांणी योग्य त्या उपाय योजनांच्या कामांना लवकरात लवकर सुरूवात करावी अशा सुचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.