| तळा | प्रतिनिधी |
उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांची माठांना मागणी वाढली आहे. मार्च ते मे हे तीन महिने प्रचंड तापमानाचे असल्याने सामान्य नागरिक पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावठी माठांची खरेदी करतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किंमतीत वाढ झाली असून, यावर्षी 70 ते 80 रुपये अधिक दराने माठाची विक्री केली जात आहे. गर्मीच्या दिवसांत अंगाची लाही लाही होत असताना माठातले शुद्ध व थंड पाणी तहान भागवून समाधान देते. हल्ली सर्वच ठिकाणी फिल्टर पाण्याचे थंड जार मिळत असल्याने बाजारपेठेत व्यापारी वर्ग जार घेणे पसंद करतात. मात्र, ग्रामीण भागात नागरिकांना माठाचे महत्व माहिती असल्याने आजही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात गावठी माठांना मागणी आहे. तळा बाजारपेठेत गावठी माठ विक्रीसाठी दाखल झाले असून, लहान माठ 150 तर मोठा माठ 300 रुपये दराने विक्री केली जात आहे.







