आयपीएलचा मेगा लिलाव भारताबाहेर?

नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आयोजन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे आयोजन होणार आहे. आता या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यावेळी मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची सुटका (रिलीज) आणि कायम ठेवण्याची (रिटेन्शन) यादीही जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, बीसीसीआय नवीन रिटेन्शन नियमही जारी करणार आहे.

बीसीसीआय सध्या मेगा लिलावाची तयारी करत आहे. हा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाऊ शकते. नवीन रिटेन्शन नियमही या महिन्याच्या शेवटी जाहीर केले जाऊ शकतात. याआधी आयपीएलचा पहिला मेगा लिलाव 2014 मध्ये झाला होता. तर, दुसरा मेगा लिलाव 2018 मध्ये झाला होता. आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षांत आयपीएलमध्ये फक्त दोनच मेगा लिलाव झाले असून आता पुन्हा एकदा 2025 मध्ये मेगा लिललावाची तयारी सुरू झाली आहे.

आयपीएलसाठीचा मेगा लिलाव कोठे आयोजित केला जाईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही परदेशात लिलाव आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 मधील लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर 2023 मध्ये भारतातच लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावेळी पुन्हा हा कार्यक्रम परदेशात आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, आययपीएल मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन नियमदेखील जाहीर केले जाणार आहेत. हा नियम कोणता संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकेल यावर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलतील.

रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. गेल्या मोसमात मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यामुळे रोहितचे चाहतेही संतापले होते. अश्या स्थितीत आगामी हंगामासाठी संघ काय निर्णय घेतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Exit mobile version