नीती आयोगाची माहिती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बलाढ्य जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांना ही चांगली बातमी दिली.
जगभर मंदीचे मळभ दाटले आहेत, अनेक देशांमध्ये युद्ध चालू असून, त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होत आहे, अमेरिकेने विविध देशांवर परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लावलं असून चीन व युरोपियन महासंघाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी जग व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा कठीण काळात भारतीय अर्थव्यवस्था केवळ तग धरून उभी नाही तर ती पुढे सरकत आहे. या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकणं ही मोठी उपलब्ध मानली जात आहे. बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था ता 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे.
‘तीन वर्षांत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार?
बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे. सुब्रह्मण्यम आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) माहितीचा हवाला देत म्हणाले, भारत आता जपानच्या पुढे गेला आहे. आता आपण 4 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत. आपण आपल्या चालू योजनांवर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आपण जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (24 मे) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाची 10 वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली होती. या बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी राष्ट्रीय विकासात सामूहिक व सामाजिक विकासावर जोर दिला.
4 ट्रिलियन डॉल्स म्हणजे किती?
चार ट्रिलियन डॉलर्स म्हणजे 4,000 अब्ज डॉलर्स, म्हणजेच भारतीय रुपयांत 340 लाख कोटी (34,06,84,74,24,00,000).