| मुंबई | प्रतिनिधी |
रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे मालवाहतूक सुरळीत, जलदगतीने होण्यास मदत होईल.
मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण 7.54 किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी 444.64 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल.पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड-सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे. या नवीन रेल्वेच्या जाळ्यामुळे रेल्वेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि गर्दी कमी होईल. ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दोन कॉर्ड लाइन
जेएनपीटी ते कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
काळदुंरीगाव केबिन आणि सोमाटणे स्थानकादरम्यान कॉर्ड लाइन