महाकाय लाटा उसळणार; नागरिकांना सावधानतेचा इशारा
| रायगड | प्रतिनिधी |
यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 18 दिवस धोक्याचे असून, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 19 वेळा महाकाय अर्थात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येऊन समुद्राला मोठी भरती येणार आहे. मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास जिल्हा जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे जून आणि ऑगस्टमध्ये पाच दिवस अधिक उंचीच्या लाटा येणार आहेत, तर सप्टेंबरमध्ये चार दिवसांत पाच वेळा लाटा येणार आहेत. तसेच जुलैतही चार दिवस सर्वात उंचीच्या लाटांसह भरती येणार आहे. पावसाळ्यातील 18 दिवसांच्या कालावधीत 19 वेळा साडेचार मीटरपेक्षा मोठ्या लाटा येणार आहेत. यामध्ये सर्वात मोठी लाट ही 26 जूनला दुपारी 12.55 मिनिटांनी 4.75 मीटरची येणार आहे, तर सर्वात लहान लाट ही 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12.47 मिनिटांनी येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पावसाच्या घडामोडीचा अंदाज घेतला जातो. त्यात भारतीचे दिवस कोणते, लाटांची उंची किती या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात येतो. अतिवृष्टीत अचानक घडणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी नियोजन केले जाते. यंदाच्या पावसाळ्यात 18 दिवस सर्वात मोठी भरती येणार असून, त्या वेळी साडेचार मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जिल्हा आपत्कालीन विभागाने वर्तवला आहे.
68 गावांना उधाणाचा धोका
मुरूड तालुक्यातील 9, उरणमधील 4, पेण-9, अलिबाग-11, उरण-5, श्रीवर्धन-11, माणगाव-2, महाड-6 आणि म्हसळ्यातील 11 गावांना उधाणाचा धोका आहे.