साडेसहा हजार मच्छिमार व्यावसायीक चिंतेत
| श्रीवर्धन | वार्ताहर |
पावसाळी मासेमारी बंदीच्या अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. 31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. परंतु, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने 21 मे ते 24 मे पर्यंत मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 30 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, श्रीवर्धन तालुक्यातील 981 बोटी बंदरावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.
31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. पण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टया मुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. याचा फटका मच्छीमार व्यावसायीकांना बसला असून, या वेळी बांगडा, करली व काही प्रमाणात कोलंबी ची आवक वाढली होती. परंतु, ही बंदी मुळे मासळी मिळणे कठीण झाल्याने खवय्ये नाराज झाले आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, लहान बोटींचा वापर टाळावा, सुरक्षेची आवश्यक साधणे जवळ बाळगावी, वाऱ्याचा वेग आणि मोठ्या लाटांचा जोर लक्षात घेऊन सर्व नौका आणि होड्या सुरक्षितस्थळी उभ्या कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पावसाळी मासेमारी बंदी 31 मे मध्यरात्रीपासून सुरु होणार होती. परंतु, तत्पूर्वीच बदललेल्या वातावरणामुळे मच्छीमारांना धोक्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे आत्तापासूनच मच्छीमारी बोटींचे समुद्रात मासेमारीसाठी जाणे थांबले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात 623 मोठ्या बोटी तर 358 लहान बोटी असून, खराब वातावरणामुळे सर्व बोटी बंदरावर नांगरण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन येथे जीवनाबंदर, मुळगाव कोळीवाडा तर तालुक्यात दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, बागमांडला या परिसरात मच्छीमार व्यवसायिक आहेत. तालुक्यात एकूण साडेसहा हजार मच्छीमार व्यवसायिक असून, खराब वातावरणामुळे मच्छीमार व्यवसायिक चिंतेत पडला आहे. शासनाच्या आदेशानुसार दोन महिने आम्ही मच्छीमार व्यावसायिक मासेमारी बंद ठेवतो व शासनाच्या आदेशाचे पालन करतो. या काळात आमचे आर्थिक नुकसान होते. शासनाने आमचा विचार करून सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा असे मच्छीमार व्यावसायिकांनी मत मांडले आहे.
निसर्ग चक्रीवादळ व ताऊक्ते चक्रीवादळा नंतरचे वातावरण बघता बारा महिन्यातील काही दिवस हे वातावरण खराब, हवामान खात्याने दिलेले इशारे या कारणास्तव मच्छीमार व्यवसायिक मासेमारी बंद ठेवतात. मासेमारी बंद हे आमचे आर्थिक नुकसान असते. मच्छिमार व्यावसायीकांनी व्यवसाय वाढीसाठी घेतलेली बँकांची कर्ज,डिझेल परतवा हे प्रश्न आहेतच. या सर्वांचा शासनाचे विचार करून मच्छीमार व्यावसायिकांकडे सहानुभूतीने बघावे.
हरिदास वाघे,
मच्छिमार व्यवसायिक,
जीवनाबंदर