नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर वाहतूक बंद
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रेल्वे स्थानकातील यार्ड नूतनीकरण अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईनवर दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दीड आणि एक तासाचा मेगा ब्लॉक असून या काळात नेरळ ते कर्जत दरम्यानची उपनगरीय गाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी अभियांत्रिकी कामासाठी दोन अजस्त्र क्रेन वापरण्यात आले.
कर्जत रेल्वे स्थानकात यार्डच आधुनिकीकरण केले जाणार आहे. या अभियांत्रिकी कामांसाठी दोन दिवसांचा ब्लॉक मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे दहा ते सव्वा बारा या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला. त्या कालावधीत नेरळ ते कर्जत या दरम्यानची मेन लाईन वरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. या अभियांत्रिकी ब्लॉक मध्ये कर्जत रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेल्या यार्ड चे नूतनीकरण करण्याच्या कामातील अडथळे दूर करण्यात येत आहेत. त्यासाठी दोन इंजिन आणि दोन क्रेन तैनात ठेवण्यात आले होते. तर त्या ठिकाणी आवश्यक कामे करण्यासाठी भिवपुरी रोड रेल्वे स्थानक ते पळसदरी रेल्वे स्थानक या दरम्यान वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मेन लाईन वरील नेरळ पासून कर्जत पर्यंत आणि पुढे खोपोली पर्यंत सर्व वाहतूक दीड तास बंद ठेवण्यात आली होती.
मेगाब्लॉक मुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जत खोपोली कडे होणारी उपनगरीय लोकल ची वाहतूक नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक पर्यंत होत होती. त्यानंतर नेरळ येथील वेळेनुसार उपनगरीय लोकल पुन्हा मुंबई कडे रवाना होत होत्या.
रविवारी पुन्हा काम
रविवार 4 डिसेंबर रोजी देखील कर्जत यार्ड मधील नूतनीकरण ची उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी सकाळी अकरा ते सव्वा बारा असा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्या कालावधीत देखील नेरळ ते कर्जत आणि पुढे खोपोली या मार्गावर गाड्या बंद असणार आहेत. त्या वेळी देखील मुंबई येथून कर्जत कडे येणार्या उपनगरीय लोकल नेरळ स्थानकातून मुंबई साठी रवाना होणार आहेत.