अॅड. मानसी म्हात्रे यांचे प्रतिपादन
अलिबाग न.पा.तर्फे साहित्य वाटप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत. यासाठी मंत्रालयावर धडक मारण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांनी शनिवारी अलिबाग येथे केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अलिबाग नगरपालिकेच्या विद्यमाने नगरपालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तींना हक्क व अधिकाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी अंगाई साळुंके यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी म्हात्रे बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी अंगाई साळुंके, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना खीर, माजी नगरसेवक अनिल चोपडा, सहकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जवळपास 98 लाभार्थी दिव्यांगांनी तसेच त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
उपस्थितांसमोर बोलताना अॅड. मानसी म्हात्रे यांनी अलिबाग नगरपालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांसाठी काय काय लाभ आहेत, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, नगरपालिकांनी वार्षिक अंदाजपत्रक जे असते, त्यातील पाच टक्के हा दिव्यांगांसाठी खर्च केलाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामधून दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या वस्तुंची खरेदी करुन त्यांचे योग्य पद्धतीने वाटप करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
त्यांनी आपल्या भाषणातून दिव्यांगांच्या विविध समस्यांचाही आढावा घेतला. आता तुम्हीही आमच्या बरोबरीने चला. तुमच्या ज्या काही मागण्या असतील, त्याचे नियोजन करा. आपण मिळून दिव्यांग मंत्रालयापर्यंत पोहोचू. तुमचे जे काही काम असेल ते करू. गरज पडल्यास तुमच्यासाठी भांडू आणि तुम्हाला ते मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित लाभार्थी दिव्यांगांना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.