मेंढपाळाचा प्रवास म्हणजे जणू तारेवरची कसरत
| रसायनी | वार्ताहर |
कडाक्याची थंडी म्हणू नका, अथवा अंगातून घाम गाळणारे उन म्हणू नका. रस्त्यावरुन, डोंगरदर्यातून शेकडो मेंढरं घेत कळपाने जाणार्या घाटावरील मेंढपाळाची स्थिती आज हितं तर उद्या तिथं अशीच झाली आहे. या मुक्या जनावरांना जीवापाड सांभाळताना या मेंढपाळांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
कोकणात सध्या मोठ्याप्रमाणावर मेंढपाळ दाखल झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना जणू त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच वाहने वेगाने जात असल्याने मेंढ्याना अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर संभावत आहे. त्याच बरोबर रात्री थंडी पडत असल्यामुळे आरोग्यांचा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. मात्र पूर्वीपासून सुरु असलेल्या व्यवसायाला खंड पडू नये, यासाठी त्यांचा मेंढपाळचा व्यवसाय सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
कोकणात मोठ्याप्रमाणावर काटेरी वनस्पती, झाडे- झुडपे असल्यामुळे यापासून मेंढ्यांना सकस आहार मिळत असतो. मात्र कोकणात वाढत्या उद्योगामुळे काटेरी वनस्पतींचा र्हास होत आहे. प्रदूषण, वणवे लागणे अशा अनेक कारणांमुळे मेंढपाळ संकटात सापडत चालले आहे. त्याच बदलत्या वातावरणात मेंढ्या आजारी पडणे, यामुळे मेंढ्या पालन करतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात नव्हे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर मेंढपाळ आले असून, सायंकाळ होताच मेंढ्या एकत्र शेतात बसवून तंबू ठोकून दुसर्या दिवशी पुढच्या प्रवसाला निघणे असे चक्र जणू आठ महिने सुरु असते. मात्र या अनेक महिन्यामध्ये विविध समस्या भेडसावत असल्यामुळे मेंढपाळ पाळणे म्हणजे जणू तारेवरची कसरत करावी लागत असल्यांचे पहावयास मिळत आहे.