मेंदडी बौद्धवाडी तहानलेली

पाण्यावाचून कसं राहायचं? महिलांची विचारणा

| दिघी | वार्ताहर |

जोरदार पावसाची हजेरी होऊन, अद्याप पावसाळा संपला नाही. मात्र, म्हसळा तालुक्यातील मेंदडी बौद्धवाडीला यंदाही शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याशिवाय येथील रुग्णालयात देखील पाणी समस्यांची झळ बसत आहे. दिघी-पुणे महामार्गावर मेंदडी हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहरांची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा- दिघी मार्गावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी बौद्धवाडीवर साधारण 30 कुटुंबांतील जवळपास 85 लोक राहतात. पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी बौद्धवाडीला अद्यापही पाणीटंचाई सोसावी लागत आहे.

परिणामी, येथील नागरिक पाण्यासाठी मैलो मैलोभर वणवण फिरत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत फारसे कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, सरकारने येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र पाणी योजना राबवली. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून आजही संताप व्यक्त केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात दूरदृष्टी ठेऊन विविध विकास कामे करण्यात आली. तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या. मात्र, मेंदडी गावाला पाणीपुरवठ्यासाठी धरण असून, या धरणाचे पाणी बौद्धवाडीला मिळत नाही. वेळोवेळी पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यापासून तहानलेले आहेत.

हर घर जल आलेच नाही
येथे भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत 2007 मध्ये 2 लक्ष निधीतून पाणी योजना राबवण्यात आली. तर दुसऱ्यांदा 2016 मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून ‌‘स्वजल धारा’ या पाणी योजनेसाठी 10 लक्ष निधी वापरण्यात आले. मात्र, दोन्ही योजनेतून घराघरात पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थ रानातील झऱ्यातून पाणी आणून पितात. अशाने येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी दूर करणे प्रशासनाला आव्हानात्मक असून, प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे मेंदडी बौद्धवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.

रुग्णालयाला बसते झळ
बौद्धवाडी हद्दीत पशुवैद्यकीय व प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्ही रुग्णालयात पाण्याची समस्या आहे.

जलसंधारणाची गरज
शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात. मात्र, अशा योजनाचा फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही. तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात जलसंधारण तसेच जल संवर्धनसारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे. मेंदडी गावाजवळच औद्योगिकीकरण होत असून, येथील नागरिकांना पाण्यासारख्या सुविधा मिळू शकत नाही.

अशुद्ध पाणीपुरवठा
बौद्धवाडी परिसरात पाणी साठवणुकसाठी टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीला दहा-बारा वर्षे उलटून गेली. मात्र, एकदा ही साफसफाई करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाडीवर पिण्यासाठी पाणी नाही. या समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. गेली कित्येक वर्षे पाणी मिळण्यासाठी पत्रव्यवहार करत आहोत. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.

अरुण जाधव, रहिवासी, बौद्धवाडी मेंदडी

मेंदडी बौद्धवाडीवर पाण्याची सुविधा मिळण्यासाठी मोटार बसविण्यात आली असून, दोन दिवसांपूर्वी मोटारीत बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे.

राजश्री कांबळे, मेंदडी सरपंच
Exit mobile version