संतापजनक! पनवेलमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार

आरोग्यसेवक, डॉक्टर आणि पोलिसांमुळे गुन्हा उघडकीस

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेलमधील 25 वर्षीय मतिमंद आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय असला, तरी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी स्वतः तक्रारदार होत गुन्हा नोंदविला असून, अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी न्यायवैद्यक आणि डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

पीडित मुलीच्या पोटावरून ती गर्भवती असल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर गावात ही बाब समजू नये म्हणून तिला तालुक्यातील नातेवाईकांकडे पाठविण्यात आले. त्या दाम्पत्याला अपत्य नसल्याने जन्माला येणारे बाळ दत्तक घेण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार रुग्णालयात दाखल करताना कागदपत्रांमध्ये दत्तक घेणाऱ्या महिलेचे नाव प्रसुतीसाठी वापरण्यात आले. पीडितेची 26 जून रोजी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात प्रसूती झाली. तिने एका बालिकेला जन्म दिला. नवजात बालिकेची प्रकृती नाजूक असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले. या काळात नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीत विसंगती आढळल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांची चौकशी केली. सुरुवातीला कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, रुग्णालयातील मानसशास्त्रज्ञांच्या परीक्षणात पीडित महिलेची बौद्धिक आणि सामाजिक परिपक्वता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालानुसार ती माहितीपूर्ण संमती देण्यास सक्षम नसल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर या महिलेचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय बळावला. या अहवालाच्या आधारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार वसेकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रसूतीच्या कालावधीच्या आधारे अत्याचाराची संभाव्य वेळ निश्चित करण्यात आली असून, त्या काळात पीडित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. काही नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याची प्रक्रियाही सुरू असून, न्यायवैद्यक तज्ज्ञांचे सहकार्य पोलिसांनी घेतले आहे. सर्वसामान्य व्यक्तीचा बुद्ध्यांक साधारणतः 90 ते 109 दरम्यान असतो, तर अतिशय उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीचा बुद्ध्यांक 130 किंवा त्याहून अधिक असतो. संबंधित पीडितेचा बुद्ध्यांक केवळ 11 असल्याची नोंद करण्यात आली. ती केवळ हसून प्रतिसाद देते आणि तिला सांकेतिक भाषाही समजत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या मानसशास्त्रीय परीक्षणात ती माहितीपूर्ण संमती देण्यास सक्षम नसल्याचे निष्पन्न झाले. तिच्या संमतीशिवाय तिचे लैंगिक शोषण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version