| पनवेल | वार्ताहर |
दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने खारघरमधून मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली आहे. परवेज फिरोज मन्सूरी (38) असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळ सापडलेला 1 लाख 44 हजार रुपये किमतीचा 36 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त केला आहे. आरोपीने ज्या व्यक्तीकडून मेफॅड्रॉन आणले, त्याचा दहशतवाद विरोधी पथकाकडून शोध सुरू आहे.
खारघर सेक्टर-2 मधील कोर्टयार्ड कॅफेजवळ एक व्यक्ती मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा शेंडगे व त्यांच्या पथकाने खारघरमधील कोर्टयार्ड कॅफेजवळ सापळा लावला होता. यावेळी परवेज फिरोज मन्सूरी हा एका कारमधून संशयास्पदरीत्या फिरताना आढळला असता, दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीने दोन सिगारेटच्या पाकिटात प्लॅस्टिक पिशवीत लपवून मेफेड्रोन (एमडी) आणल्याचे आढळले. पथकाने त्याच्याकडे सापडलेला 1 लाख 44 हजार रुपये किमतीचे 36 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त केले. परवेज विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. परवेजने मालाड येथील रफिक नावाच्या व्यक्तीकडून हे मेफेड्रोन आणल्याचे चौकशीत सांगितले आहे.
सिगारेटच्या पाकिटात अमली पदार्थ
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला पोलिसांचा संशय आल्याने त्याने अमली पदार्थ असलेले दोन्ही सिगारेटची पाकिटे रस्त्यालगत टाकून दिली होती. पोलिसी खाक्या दाखवतातच त्याने दहशतवाद विरोधी पथकाला माहिती देताच सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली.