भाजपाच्या मोर्चात भाडोत्री गर्दी; हिशोब ठेवताना कार्यकर्त्यांची तारांबळ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मालेगाव नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या तसेच त्रिपुरात केलेल्या नासधुसीच्या निषेधार्थ अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांची संख्या पाहता मोर्चात ताकद दाखविण्यासाठी चक्क रोजंदारीवरच्या मजुरांना मजूरी देऊन आणण्यात आले होते. मोठया प्रमाणावर मजूरांचा भरणा असलेला हा मोर्चा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला होता.


भाजपाचे उत्तर दक्षिण असे दोन्ही अध्यक्ष आणि पेणच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. पढवलेल्या घोषणा देत आणि आपल्या मजुरीचा अंदाज बांधत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. पोलिसांनी तेथे अडविल्यावर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मग मजुरांसमोर नेत्यांनी भाषणे ठोकण्यास सुरुवात केली. मात्र या गर्दीला भाषणापेक्षा मजुरीत रस असल्याने कोणताच अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच आवरते घेत या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यास गेले. त्यांची पाठ वळते न वळते तोच भाडोत्री मजूरांच्या मोर्चाने देखील पाठ वळविली. मजूरांचा हा जत्था थेट भाजपाच्या कार्यालयाजवळ जाऊन पोहचला. तेथे हजेरी प्रमाणे आपापला मोबदला मागण्यास सुरुवात केली. मग प्रत्येक गँगनुसार त्यांचा गँग लिडर आपापली लिस्ट घेऊन त्याप्रमाणे हजेरी देत पैसे घेण्यास गर्दी करु लागला. तेथे पोहचलेल्या पत्रकारांना पहाताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या गँग लिडरना कोपर्‍यात घेऊन त्यांचा मोबदला देण्यास सुरुवात केली. पत्रकारांनी एका मजूरासोबत संवाद साधला असता त्यांने सांगितले की कुठल्यातरी दाक्षिणात्य चित्रपटाची शुटींग असून त्यासाठी आम्हाला बोलावण्यात आले आहे म्हणून आम्ही आलो आहोत. हा सारा प्रकार पाहून या मोर्चाची खिल्ली उडविली जात होती.

Exit mobile version