स्वातंत्र्य सैनिक दिनेश भोईर यांचा सत्कार
। वाघ्रण । वार्ताहर ।|
वाघ्रण ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवार, दि. 11 ऑगस्ट रोजी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान, सकाळी ग्रा.पं. प्रशासक ग्रामसेविका सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर वाघ्रणचे ग्रामस्थ माजी स्वातंत्र्यसैनिक दिनेश विठोबा भोईर यांचा सत्कार सुवर्णा पाटील यांनी केला. या कार्यक्रमात प्रशासनाच्या वतीने पंचप्राण शपथ सर्वांनी घेतली.
यामध्ये प्रशासक ग्रामसेविका सुवर्णा पाटील, प्रशासक विजय मयेकर, पत्रकार दिपक यशवंत पाटील, वाघ्रण शाळा मुख्याध्यापिका संगिता म्हात्रे, सहशिक्षक निलेश वारगे, रुपाली पाटील, सर्व विद्यार्थी, ग्रामपंचायत माजी सदस्य, पोलीस पाटील, वाघ्रण व खारपेढांबे गावातील ग्रामस्थ, कर्मचारी, पदाधिकारी, सामाजिक, कार्यकर्ते अंगणवाडी प्रतिनिधी, युवकांचा समावेश होता. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या अभिवादन विशेष फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रांगणात समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी अनेकांनी पूजन केले. दयानंद म्हात्रे यांनी श्रीफळ वाढविले. शेवटी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या यांनी 75 पणत्या उजळून सुरु केलेल्या कार्यक्रमाचा निरोप घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले.