एमएचटी-सीईटीला आजपासून प्रारंभ

| मुंबई | प्रतिनिधी |

अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या आणि राज्यातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा समजल्या जाणार्‍या ‘एमएचटी सीईटी’ला बुधवार (दि.9) पासून सुरुवात झाली. ‘पीसीबी’ गटाची परीक्षा पहिल्या टप्प्यात होत असून, यासाठी 3 लाख 1 हजार 723 अर्ज आले आहेत. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून यापैकी नऊ केंद्र ही राज्याबाहेर आहेत.

एमएचटी-सीईटी ही दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा 9 ते 17 एप्रिलदरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी परीक्षा होणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच ‘पीसीबी’ गटासाठी देशभरातून 3 लाख 1 हजार 723 अर्ज आले आहेत. दुसर्‍या टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच ‘पीसीएम’ या गटासाठी 19 ते 27 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे. पीसीएम गटासाठी 4 लाख 64 हजार 263 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ही परीक्षा 181 केंद्रांवर होणार असून 172 केंद्र राज्यात आणि नऊ केंद्र राज्याबाहेर आहेत.
एमएचटी-सीईटीदरम्यान गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच पर्यवेक्षकांच्या अंगावरही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे केंद्रावर होणार्‍या सर्व घडोमोडींवर बारीक नजर ठेवता येणार आहे. तर पर्यवेक्षकांच्या अंगावरील कॅमेर्‍यामुळे परीक्षा सुरू असताना प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. पर्यवेक्षकांच्या शरीराच्या पुढील बाजूला हा कॅमेरा लावण्यात येणार असल्याने पर्यवेक्षकाच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटली तरी ती कॅमेर्‍यामध्ये कैद होण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही व अंगावरील कॅमेर्‍यांबरोबरच बोगस विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहर्‍याची पडताळणी होणार आहे. ही पडताळणी करताना विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेले छायाचित्र आणि चेहरा यामध्ये 80 टक्के साम्य असणे आवश्यक असणार आहे. साम्य आढळल्यानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. चेहरा पडताळणीदरम्यान विद्यार्थ्यांचा घेण्यात आलेला तपशील जतन करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी प्रवेशासाठी येईल त्यावेळी त्याने सादर केलेले छायाचित्र, त्याच्या अर्जावरील छायाचित्र आणि परीक्षेदरम्यानच्या चेहरा पडताळणीवेळीचा चेहरा यांचे तपशील जुळवण्यात येणार आहे.

Exit mobile version