। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्यात एका परप्रांतीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जुगल सूरज राय (वय 50), रा. वर्तक वाडा, खोली क्र. 23, आंगर आळी, नागोठणे (मूळ रा. बझीतपुर, ता. सारा रंजन, जि. समस्तीपुर, बिहार) असे मृताचे नाव आहे. पत्नीच्या सततच्या आजारपणाला कंटाळून नैराश्य आल्याने या व्यक्तीने त्याच्या राहत्या खोलीत ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दया पाटील या अधिक तपास करीत आहेत.






