स्थलांतरित मतदारांची नेत्यांकडून मनधरणी

। रायगड । प्रतिनिधी ।

नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात गेलेल्या चाकरमान्यांनी गावाकडे येऊन मतदान करावे, यासाठी नेतेमंडळी स्थलांतरितांची मनधरणी करू लागले आहेत. लोकसभेच्या रायगड मतदारसंघात एकूण 16 लाख 68 हजार मतदार आहेत. यातील जवळपास चार लाख मतदारांनी बाहेरगावी स्थलांतर केले आहे. रोजगाराबरोबरच शिक्षण, रस्ते, आरोग्य या सारख्या नागरी सुविधांअभावी अनेकांनी आपली राहती घरे सोडून शहराचा रस्ता धरला आहे. इतरवेळी स्थलांतरित चाकरमान्यांची आठवण कुणालाही येत नाही, फक्त मतदानासाठी ‘दादा, मामा, काका, गावाकडे चला…’ अशी विनवणी नेतेमंडळी करू लागले आहेत.

रायगड लोकसभेसाठी सरासरी 64 टक्के मतदान होते. यामध्ये विजयी उमेदवाराला किमान पाच लाखांचा पल्ला गाठणे खूपच आव्हानात्मक असते. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक गटाला जवळ करण्याचा नेतेमंडळींचा प्रयत्न असतो. 16 लाख 68 हजार मतदारांपैकी जवळपास सहा लाख नागरिक मतदानच करीत नसल्याचे याआधीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यात शहरात राहणार्‍या स्थलांतरित मतदारांचा भरणा जास्त आहे. हे मतदार मतदानासाठी गावी येण्याचे टाळतात. तिकिटाचा खर्च करून गावाकडे येणे अनेकांना शक्य होत नाही. ही समस्या ओळखून जिल्ह्यातील नेतेमंडळी या मतदारांना गावाकडे आणण्यासाठी खास बसची व्यवस्था करतात.

यंदा गुहागर, दापोली, महाड, श्रीवर्धन या मतदारसंघात 50 सीटच्या दोनशेहून अधिक बसची व्यवस्था करण्यात आली आहे. काहींची रेल्वेने येण्याची व्यवस्था करण्यात आली असून या मतदारांना गावाला मतदानाच्या दिवशी आणण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रवास, जेवण, चहानास्ता असा लाखोंचा खर्च या अस्थायी मतदारांवर केला जाणार आहे. यासाठी स्थानिक नेतेमंडळी मतदारांच्या संपर्कात असून जास्तीत जास्त मतदारांना गावात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणांबरोबरच सुरत, बडोदा या ठिकाणी उद्योग-व्यवसायासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांमध्ये येथील राजकारण बदलण्याची क्षमता आहे. त्यांची भूमिका निर्णायक असल्याने दर निवडणुकीला काही आश्‍वासने दिली जातात; मात्र, निवडणुका संपताच त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने जिल्ह्यात स्थलांतराचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची उणीव, रोजगाराची कमतरता, शिक्षणाच्या सुविधांची गैरसोय यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा शहरी भागाकडे कल वाढला आहे. मुख्यतः रोजगाराच्या शोधात गाव सोडून शहरी भागाकडे स्थलांतरित होणार्‍या लोकसंख्येमुळे रायगड जिल्ह्यातील गावे ओस पडली आहेत.

ग्रामीण लोकसंख्येत सातत्याने घट
जिल्हा सांखिकी विभागाच्या माहितीनुसार, 1961 च्या जनगणनेनुसार 10 लाख लोकसंख्येपैकी फक्त एक लाख नागरिक शहरी भागात राहत होते. 2016 मध्ये 25 लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख नागरिक शहरी भागात राहत आहेत. ग्रामीण भागात 16 लाख राहत असून ही वाढ जवळजवळ दुप्पट आहे. म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, पोलादपूर, महाड या तालुक्यातील अनेक गावे ओस पडली आहेत. आताच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 30 लाख 28 हजार लोकसंख्येपैकी 20 लाख नागरिक शहरात राहतात, असा अंदाज आहे. तर या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या 100 हुन अधिक शाळा विद्यार्थी नसल्याने बंद कराव्या लागल्या आहेत, तर 121 बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
Exit mobile version