| पनवेल | वार्ताहर |
करपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्र ते पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरादरम्यान टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकठिकाणी फुटल्या आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याकरीता झोपडपट्टीधारक अनेक ठिकाणी वाहिन्या फोडतात. त्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. सुमारे 25 ते 30 टक्के पाण्याची गळती होत आहे . त्यामुळे त्या वाहिन्यांना पॅच मारण्याकरिता प्राधिकरणाकडून सातत्याने शटडाऊन घेतला जात आहे. या कारणाने पनवेलकर आणि सिडको वसाहतवाल्यांना तीन चार दिवस पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.पाणी पुरवठा सुरळीत होण्यात अडथळा येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
अनेकदा वेळेत काम होत नसल्याने पाणीपुरवठाही अखंडित होत नाही परिणामी त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. जुनाट झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत नसून केवळ पॅच मारण्याचे काम प्राधिकरणाकडून होत आहे. त्यामुळे नवीन पनवेलला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या नोडमध्ये साठवणूक क्षमता कमी असल्याने अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत. अशीच परिस्थिती खांदा वसाहत आणि कळंबोलीत सुध्दा आहे.