धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी प्रशासनाची धडपड; पर्यावरण बचाव समिती आक्रमक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायतीमध्ये टोरंट पॉवर कंपनी वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने वेगळ्या हालचाली सुरू झाल्याने कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे. तसेच, त्या ठिकाणच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या जमिनीवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाली असल्याने झाडे तोडण्यासाठी जमिनी कोणी दिल्या, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
गुजरात राज्यातील टोरंट पॉवर या कंपनीला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी येथे सायडोंगर भागात हायड्रॉलिक प्रकल्प उभारत आहे. या प्रस्तावित धरण प्रकल्पाला धरण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तेथे 640 हेक्टर जमीन वन विभागाची असून, 230 हेक्टर जमीन खासगी जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.वन जमिनीवर असलेली लाखो झाडे आहेत आणि ही झाडे स्थानिकांनी श्रमदान करून लावली आणि वाढवली आहेत. आता तीच सर्व झाडे तोडण्यास सुरुवात झाली असून, या धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेली झाडे नष्ट होऊ लागली आहे. बुडीत क्षेत्रातील काही जमीन क्षेत्र हे खासगी असून, त्या जमिनीवरील झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. या 15 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा दि.3 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या परिसराची हवाई सफर देशाचे पंतप्रधान करू शकतात आणि त्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील झाडांची तोड टोरंट कंपनी प्रशासनाने हाती घेतली आहे.
यावेळी टोरंटकडून सायडोंगर परिसरातील आदिवासी वाडीपासून पुढील जंगलात इलेक्ट्रिक कटर यांच्या सहाय्याने झाडे तोडली जात आहेत. त्यावेळी तोडण्यात येत असलेली झाडे तेथून उचलण्यास देखील कामगार लावण्यात आले आहेत. शंभर वर्षे आणि त्याहून जुनी झाडे तोडली जात असून, त्या ठिकाणच्या संपूर्ण परिसरात कोणत्याही झाडाच्या अडथळा नसल्याचे दाखवता यावे यासाठी सर्व झाडे तोडली जात आहेत. मात्र, येथील 640 हेक्टर जमिनीवरील झाडे लावण्याचे कोणतेही नियोजन नाही. तसेच, वन विभागाने जमीन प्रकल्पाला दिल्याचे कोणतेही पत्र वन विभाग स्थानिकांना देत नाही. तसेच, असे कोणतेही पत्र आतापर्यंत सोशल मीडियावर देखील दिसून आलेले नाही आणि असे असताना झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कर्जत पर्यावरण बचाव समिती आक्रमक झाली आहे.
32,490 झाडे तोडणार
वन विभागाने येथील 32,490 झाडे निष्कासित करून अन्य ठिकाणी त्यांची लागवड करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्या सायडोंगर परिसरात तब्बल 3 लाख झाडे आहेत, असा दावा कर्जत पर्यावरण बचाव समिती करीत आहे.
