चोरढे येथील तलावातून 60 टन कोळंबी आंध्रप्रदेशात
| अलिबाग | प्रमोद जाधव |
भात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रायगड जिल्ह्यात अनेक भागात आता मत्स्यशेतीवर भर दिला जात आहे. मुरुड तालुक्यातील चोरढे येथील तलावातून 60 टन कोळंबी आंध्रप्रदेशात पाठविण्यात आली आहे. या व्यवसायातून कोट्यावधीची उलाढाल होत जात असल्याचे समोर आले आहे.
चोरढे येथील 35 एकर जागेपैकी 25 एकर जागेत जेएमएम फिशरीज नावाची मत्स्यशेती गतवर्षापासून सुरु आहे. या जागेत कोळंबी उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायातून स्थानिकांसह अन्य भागातील सुमारे दीडशे बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. कोळंबी निर्मिती प्रकल्पामध्ये कोळंबीची देखभाल करणे. तयार झालेल्या कोंळबीची पॅकींग करणे. त्यांचे वजन करणे. त्यानंतर वाहतूक करणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. गेल्यावर्षापासून चोरढे येथे सुरु केलेल्या कोळंबी निर्मिती व्यवसायाला गती मिळत असून येथील कोळंबी स्थानिक बाजारासह मुंबई, गोवा येथील बाजारात विक्री जात आहे.
मुंबई गोवासह स्थानिक बाजारासह आंध्रप्रदेश व विदेशात सुमारे 100 टन कोळंबी पाठविण्यात आली आहे. त्यात सुमारे 30 टन कोळंबी गोवा, मुंबई व स्थानिक बाजारात पाठविण्यात आली असून 60 टन कोळंबी आंध्रप्रदेशात पाठविण्यात आली आहे. या कोळंबीतून सुमारे चार कोटीची उलाढाल झाल्याची माहिती कोळंबी उत्पादक शरद पाटील यांनी दिली.
पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब,हरयाणासह आंध्रप्रदेशात कोळंबी उत्पादनाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये मत्स्य शेतीला पुरेसी जागा आहे. परंतु हा व्यवसाय फारसा केला जात नाही. सरकारने प्रोत्साहन दिल्यास रायगड जिल्ह्यात हा व्यवसाय वृध्दींगत होण्यास चालना मिळू शकेल. मुरुड तालुक्यातील चोरढेमध्ये 25 एकर जागेत कोळंबी उत्पादनाचा व्यवसाय सुुरू केला आहे. महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांबरोबर अमेरिकासारख्या देशात येथील कोळंबी पाठविली जात आहे.
शरद पाटील, कोळंबी उत्पादक