अलिबासह रोहा, दापोली, गुहागरमधील सहा संवेदनशील केंद्र
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदार संघातील अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर या पाच विधानसभेतील दोन हजार 185 मतदान केंद्रांवर मंगळवारी (दि. 07) मतदान होणार आहे. 16 लाख 68 हजार 372 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यातील अलिबागमधील दोन, रोह्यामधील एक, दापोलीमधील एक व गुहागरमधील दोन अशी सहा मतदान केंद्र संवेदनशील असणार आहेत. या ठिकाणी पोलिसांची कुमक अधिक ठेवली जाणार आहे. महिन्याभरापासून मतदारसंघातील अनेक भागात प्रचार रॅली, सभा घेण्यात आल्या. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि.5) सायंकाळी पाचनंतर प्रचार तोफा थंडावल्या. आता मंगळवारी (दि.07) मतदान असणार आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबरोबरच कामकाज योग्य पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
मतदान केंद्रावर चोख व्यवस्था मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही फिरकू दिले जाणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केंद्राध्यक्षासह शिपाईपर्यंत सहा कर्मचारी असे एकूण 13 हजारांहून अधिक कर्मचारी दोन हजार 185 केंद्रांमध्ये असणार आहेत. जिल्ह्यातील 550 मतदान केंद्रांमध्ये मंडपची व्यवस्था केली असून, काही मतदान केंद्रामध्ये पाळणाघराचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
संवेदनशील केंद्र अलिबाग विधानसभा मतदारसंघातील नवेदर नवगावमधील दोन, श्रीवर्धन मतदारसंघातील रोहा नगरपरिषदेमधील एक, गुहागर मतदारसंघातील धोपावे, साखरी आगरमधील दोन व दापोली मतदारसंघातील वाझंलोली आमखोलमधील एक अशी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भयमुक्त वातावरणात मतदान करा निवडणुकीबरोबरच मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कालावधीत कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मतदारांना मनमोकळेपणाने दबावमुक्त व भयमुक्तपणे वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी तयारी केली आहे, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
मतदारांवर दृष्टिक्षेप | ||
एकूण मतदार | 16 लाख 68 हजार 372 | |
घरुन मतदान करणारे मतदार | तीन हजार 84 | |
85 पेक्षा अधिक वय असणारे मतदार | तीन हजार 82 | |
सर्विस मतदार | एक हजार 350 | |
एनआरआय मतदार | 57 | |
दिव्यांग मतदार | 8 हजार |