महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अनोखा प्रकार
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ब्रिटिशांनी शार्लोट लेक बांधला. या लेकमधील पाणी मुख्य भिंतीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती अनेक वर्षे सुरु आहे. मात्र, धरणाच्या भिंतीमधून लिकेज होणारे पाणी नंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विद्युत पंपाच्या सहाय्याने पुन्हा उचलून घेत असते. धरणाच्या खाली गेलेले पाणी पुन्हा उचलण्यासाठी जीवन प्राधिकरण लाखो रुपये खर्च करीत असून, माथेरानमध्ये शार्लोट लेकमध्ये जगावेगळी तर्हा दिसून येत आहे. दरम्यान, शार्लोट लेकचे संवर्धनाचे काम गेली तीन वर्षे प्रस्तावित असून, ते सुरु करावे आणि धरणाच्या भिंतीमधील लिकेज दूर करावेत, अशी मागणी माथेरान निसर्ग पर्यटन संस्था करीत आहे.
माथेरानचा शोध ब्रिटिशांनी 1850 मध्ये लावला. त्यावेळी तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेकची निर्मिती केली. मात्र, ब्रिटिश काळात बांधलेल्या त्या धरणातून पाण्याची गळती सुरु आहे. धरणाचे संवर्धन करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.धरणातून पाण्याची गळती अनेक वर्षे सुरु असून, ती गळती रोखण्यासाठी शासन आणि स्थानिक नगरपरिषद कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. नेरळ येथून उल्हास नदीवरून येणारे पाणी वगळता अन्य कोणताही पर्याय माथेरान नागरपरिषदेकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे शार्लोट लेकमधील पाण्याची गळती रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धरणाला लागलेली गळती रुौद्ररूप धारण करण्याची भीतीदेखील आहे. त्याचवेळी धरणातील पाण्याची गळती किती मोठी आहे, हे धरणात पुन्हा गळती झालेले पाणी टाकले जात आहे, त्यावरून दिसून येते.
धरणातून गळती होणारे पाणी हे धरणाच्या खाली विहिरीमध्ये साठवले जाते. त्यानंतर ते साठवलेले पाणी पुन्हा पम्पिंग करून शार्लोट लेकमध्ये टाकण्यात येते. अशी तर्हा जगाच्या पाठीवर कुठे नसेल, मात्र धरणातून गळती झालेले पाणी वाया घालवले जात नसल्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा दावा आहे. मात्र, धरणाची गळती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी केला आहे. गेली तीन वर्षे माथेरान पालिका शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम करणार आहे, असे जाहीर करीत आहे. पण, माथेरान पालिका कशासाठी थांबली आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.