महाविकास आघाडीत एमआयएम नाहीच

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासोबत असणार नाहीत – संजय राऊत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे, आमच्यासोबत असणार नाही, भेट झाली म्हणजे आघाडी होत नाही असे मत राऊतांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे एमआयएमने युतीसाठी महाविकास आघाडीसमोर हात पुढे केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. भाजप आणि एमआयएमची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत, असे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगालमध्ये पाहिलेले आहे. एमआयएमला जर उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करायचा होता, तर त्यांनी काळजीपूर्वक पावले टाकायला हवी होती. जे आधीच भाजपबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत, ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाहीय असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version