भातपिकावर परिणाम होण्याची भीती
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अवजड वाहतुकीमुळे कामावर त्याचा परिणाम होत असल्याने या मार्गावरील अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फटका रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अवजड वाहतूक बंदीमुळे खत वेळेवर दुकानात पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भातपिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यामध्ये 20 हजार 20 मेट्रिक टन खतांचा खप सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, भात पेरणीपासून लागवडीपर्यंत खतांचा पुरवठा जिल्ह्यात करून दुकानांपर्यंत वितरीत करण्याचे काम करण्यात आले आहे. चेंबूर येथील आरसीएफ कंपनीतील युरिया खताला ऑगस्ट महिन्यात दोन हजार 303 मेट्रिक टन इतकी मागणी करण्यात आली असून, दोन हजार 153 मेट्रिक टन खत जिल्ह्यातील दुकानांना वितरीत केले आहे. सप्टेंबरदरम्यान भातपीक बहरास येण्यास सुरू होईल. या कालावधीत पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सरासरी 300 मेट्रिक टन खताची मागणी असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आरसीएफ कंपनीकडून युरिया खताचा पुरवठा करून तो दुकानदारांपर्यंत पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबईकडून गोवा मार्गावर जाणाऱ्या अवजड वाहनांना पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे. त्यासाठी पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविण्यात यावी, अशी सूचना नवी मुंबई येथील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या अवजड वाहतूकीच्या बंदीचा फटका रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. सध्या भातपिकाच्या वाढीचा हंगाम सुरु झाला आहे. पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे.
मुंबईमधून रायगड जिल्ह्यातील दुकानांमध्ये खत वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अवजड वाहनांना बंदी असल्याने जिल्ह्यातील दुकानांपर्यंत खत वेळेवर पोहोचविण्यास अडचणी निर्माण होत आहे. सोमवारी 28 ऑगस्ट रोजी मुंबईमधून पेणकडे खताने भरलेला ट्रक घेऊन चालक जात होता. 25 टनाचा हा ट्रक मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी अडवला. पुन्हा ट्रक या मार्गावरून ट्रकची वाहतूक केल्यास कारवाईची तंबी दिली. कारवाईच्या भीतीने जिल्ह्यात खत पोहोचविण्यास ट्रक चालकांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये युरिया खत शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचेल की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रवेशबंदीवर दृष्टीक्षेप ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशा वाहनांची वाहतूक मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वर 27 ऑगस्ट ते 28 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पळस्पे फाटा, कोळखेगाव, कोन फाटा, कोन गाव, एक्स्प्रेस ब्रीज, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, खालापूर, पाली फाटा, वाकण फाटावरून गोवा महामार्ग येथून वाहने जाण्यास मुभा दिली आहे. पुणे-मुंबई क्रमांक चारवरून पुण्याकडून येणारी जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
कोन फाटा, कोन गाव, एक्स्प्रेस ब्रीज, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, खालापूर, पाली फाटा, वाकण फाटा वरून गोवा महामार्ग येथून वाहने निश्चीतस्थळी जाण्याची पर्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, मेडिकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने वगळून अग्नीशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना लागू असणार नाही, अशी माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाचे तिरूपती काकडे यांनी दिली.