मिनिट्रेन रेल्वे रूळ बदलणार

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फेर्‍या वाढण्याची शक्यता

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानकरांची जीवनवाहिनी असलेली आणि पर्यटकांची आवडती नॅरोगेज रेल्वे मिनी ट्रेन कात टाकत असून या 21 कि. मी मार्गात अनेक बदल होत आहेत. मध्य रेल्वेने घाट सेक्शनमध्ये सिमेंट स्लीपर बसवल्या तर काही ठिकाणी रूळ बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आता सध्या माथेरानमधील अमनलॉज-माथेरान या शटल सेवेच्या मार्गावर सिमेंट स्लीपर आणि रूळ बदलण्याचे काम हाती घेतले आहे. दिवसा मिनिट्रेनच्या फेर्‍या सुरू असल्याने येथे रात्रीच्या वेळेस हे काम होत असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

माथेरान या पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण म्हणजे माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेन होय. नॅरोगेज मार्गावर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू आहे. सकाळी 8.50 आणि सकाळी 10.30 या वेळेत नेरळहून माथेरानकडे मिनी ट्रेन रवाना होते. दरम्यान या मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंती, गॅबियन वॉल, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे नियोजन केले आहे.

आता घाट सेक्शनमधील कामे उरकत आता अमनलॉज-माथेरान या शटल आणि नेरळ-माथेरानच्या मुख्य मार्गावर लोखंडी स्लीपर काढून त्याजागी या मार्गासाठी खास बनविलेले सिमेंटचे स्लीपर बसवण्याचे तसेच जीर्ण झालेले रूळ बदलण्याचे काम सुरू आहे. दिवसा नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फेर्‍या आणि त्यात शटल सेवेच्या फेर्‍या यामुळे या मार्गावर काम करणे कठीण असल्याने रात्रीच्या वेळेस हे काम करण्यात येत आहे. ही कामे पूर्णत्वास आल्यानंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या फेर्‍या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version