| मुंबई | प्रतिनिधी ।
आग्रीपाडा परिसरातील वाय पुलावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील अल्पवयीन मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हुध अन्सारी (16) असे मृत मुलाचे नाव असून शनिवारी त्याच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आग्रीपाडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री दीड वाजता हुध त्याच्या आतेभाऊ अब्दुलबरोबर दुचाकीवरून घरी जेवण आणण्यास जात होता. त्याचवेळी, वाय ब्रिजवरून जात असताना अब्दुलने हलर्जीपणाने भरधाव वेगात दुचाकी चालवून पुढे जाणार्या एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्याच्या मागे बसलेल्या हुध अन्सारीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नागपाडा पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पोलिसांनी याप्रकरणी अब्दुल अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






