। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलगी महाड येथे राहणारी असून आरोपी पनवेल येथे राहतो. दोघेही नेरूळ येथील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांची ओळख झाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने 17 ऑगस्ट रोजी पीडितेला नेरूळ येथून मोटारसायकलवरून पनवेल येथील आपल्या घरी नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने सुरुवातीला याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात तिने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून 14 सप्टेंबर रोजी त्याला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी कारवाईची माहिती दिली. पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत.






