| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याच्या धक्कादायक प्रकरणात माणगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पळसगाव ग्रामपंचायत हद्दीतील घरोशीवाडी येथे राहणाऱ्या निधी उतेकर या अल्पवयीन मुलीचा मृतदेह बुधवारी जंगल परिसरात आढळून आला होता. उतेकर कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी गावात आले होते. सोमवार, 25 मे रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास निधी वडिलांच्या मोबाईलवर बोलत घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू असतानाच बुधवारी घरोशीवाडीच्या जंगलातील निर्जन ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला.
मुलीच्या शरीरावरील जखमा पाहता हा खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या गंभीर घटनेचा तपास वेगाने करत माणगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे घरोशीवाडी येथीलच शुभम उतेकर (32) याला गुरुवार, 28 मे रोजी सकाळी सातच्या सुमारास ताब्यात घेतले.
या तपासासाठी पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस उपअधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिली.
Murder Case: अल्पवयीन मुलगी हत्या प्रकरण; 24 तासांत आरोपीला बेड्या
