। अलिबाग । वार्ताहर ।
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनककार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने देण्यात येणार्या 2022 च्या राज्यस्तरीय ङ्गदर्पणफ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.19) संस्थेच्यावतीने अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.
संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या धाडसी महिला पत्रकार पुरस्कार शीतल करदेकर, दर्पण पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र विभाग अनुराधा कदम, मराठवाडा विभाग प्रल्हाद उमाटे, विदर्भ विभाग प्रा.डॉ.राजेंद्र मुंढे, उत्तर महाराष्ट्र विभाग जयप्रकाश पवार, कोकण विभाग शैलेश पालकर, सुरेश कौलगेकर, विशेष दर्पण पुरस्कार किरण बोळे, स.रा.मोहिते यांना देण्यात येणार आहेत.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 176 व्या पुण्यतिथीनिमित्त महूाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील दर्पण सभागृहात 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास कोकण प्रादेशिक पर्यटन विकास समितीचे नूतन उपाध्यक्ष संदेश पारकर, देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे प्रमुख सतीश मदभावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी 6 जानेवारी 2023 रोजी समारंभपूर्वक होणार असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.