। ठाणे । प्रतिनिधी ।
अंबरनाथमध्ये महालक्ष्मी नगर येथील एका रेशनदुकानदाराला पामतेलासमवेत अन्य शिधा जिन्नसांचा अपहार करताना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात शिधा वाटप दुकानदारासोबत त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पूर्व येथील महालक्ष्मी नगरात मैत्रिण ओद्योगिक उत्पाद सहकारी संस्थेच्या शिधावाटप दुकानात पामतेल आणि अन्न धान्याचा काळा बाजार होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला होता. त्यांनी या दुकानावर पाळत ठेवत सोमवारी (दि.9) दुकानदार सुभाष भारती आणि त्याचा साथीदार कुंदन कुमार गुप्ता यांना शिधाधारकांना वितरित करण्यासाठी आणलेल्या पामतेल आणि इतर शिध्याचा काळा बाजार करत असताना पकडले. ही घटना समजताच अंबरनाथ रेशनिंग विभागाचे अधिकारी शशिकांत बाळकृष्ण पोटसुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिधावाटप दुकानाची झाडाझडती घेतली असताना त्यांना पामतेल आणि अन्य शिधा जिन्न्स कमी प्रमाणात आढळून आले. त्यांनी रेशन दुकानदाराविरुद्ध अनधिकृतपणे जीवनावश्यक वस्तूंचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.