शिक्षकांकडून शासन यंत्रणेची दिशाभूल

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

खेड तालुक्यामध्ये विविध गावांतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांपैकी काहींनी शासनाच्या यंत्रणेची दिशाभूल करत स्थानिक असल्याचे दाखले घेऊन नियुक्त्या मिळवल्या आहेत. अशी लेखी तक्रार काही जणांनी शिक्षण विभागाकडे केली असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

सरकारने कंत्राटी पद्धतीने अर्हता धारक उमेदवार शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये नेमण्यास परवानगी दिली आहे. भरती प्रक्रियेत तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य मिळावे यासाठी स्थानिक रहिवासी असल्याचा दाखल उमेदवारांना बंधनकारक करण्यात आला आहे. खेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत तालुक्यात 72 उपशिक्षक, 12 उर्दु व पदवीधर शिक्षक पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत. यासाठी विहीत नमुन्यात अर्ज व रहिवासी दाखला क्रमप्राप्त आहे.

यासाठी काही कर्मचार्‍यांनी आपल्या नातेवाईकांचा अर्ज सादर केला आहे. जे कर्मचारी 2011 नंतर खेडमध्ये सेवेत रुजू झाले. त्यांनी आपल्या ओळखीचा फायदा घेत आपल्या नातेवाईकांसाठी खोटे राहिवासी दाखले जोडले आहेत. या परजिल्ह्यातील उमेदवारांनी तहसीलदार यांचाही दाखला मिळवला असल्याने त्यांचे नाव स्थानिक असल्याचे प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये आढळून आल्याने, स्थानिक उमेदवारांनी या नावांवर आक्षेप नोंदवला आहे. जे कर्मचारी स्वतःच नोकरी करताना कार्यक्षेत्रात राहत नाहीत तर त्यांचे नातेवाईक स्थानिक म्हणून कसे ठरु शकतात, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. स्थानिकांवरील या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याची प्रत प्रांताधिकारी खेड, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी खेड यांना दिली आहे.

Exit mobile version